झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मालिकेतील साधी पण हुशार असणारी पारू प्रेक्षकांना भावली. ‘पारू’मधील इतर पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करतात. मात्र, या मालिकेतून लवकरच एक अभिनेत्री एक्झिट घेण्याचा तयारीत आहे. लोकप्रिय अभिनेत्री ‘पारू’ मालिका सोडणार आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
‘पारु’ मालिकेत अनुष्का हे पात्र अभिनेत्री श्वेता रांजन खरात साकारत आहे. दिशाची बहीण म्हणून आलेली अनुष्का किर्लोस्करांसाठी संकट ठरली होती. मात्र आता तिचा खरा चेहरा पारू लवकरच सर्वांसमोर आणणार आहे. अनुष्का दिशाची बहीण असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. याबरोबरच अनुष्का या पात्राचा मालिकेतील ट्रॅकही संपणार आहे. त्यामुळेच अभिनेत्री मालिकेतून एक्झिट घेणार आहे.
श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सेटवरील फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर करत “एकदा शेवटचं” असं लिहिलं आहे. या स्क्रिप्टवर “Have a great last day Anushka” असं लिहिण्यात आलं आहे. अनुष्काचा खरा चेहरा समोर आल्याने आता मालिकेतही वेगळं वळण पाहायला मिळणार आहे.