१९८७ मध्ये दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांनी ‘मिस्टर इंडिया’ सिनेमा (Mr India Movie) बनवला होता. बोनी कपूर (Boni Kapoor) निर्मित मिस्टर इंडिया या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये सुपरहिरो प्रकार सुरू केला. चित्रपटात अनिल कपूर(Anil Kapoor)ने एका सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे जो घड्याळ घातल्यानंतर अदृश्य होतो. या चित्रपटात श्रीदेवीनेही मुख्य भूमिका साकारली होती आणि अमरीश पुरी यांनी मोगॅम्बोची भूमिका साकारली होती. हा चित्रपट मे १९८७ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील होता. मिस्टर इंडियाच्या यशाने अनिल कपूरचे स्टारडमही गगनाला भिडले. पण तुम्हाला माहीत आहे का की, अनिल कपूरला मिस्टर इंडियासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिस्टर इंडियाच्या भूमिकेसाठी राजेश खन्ना निर्मात्यांची पहिली पसंती होती. सलीम-जावेद यांनी त्यांना डोळ्यासमोर ठेवून मिस्टर इंडिया लिहिल्याचे बोलले जात होते. मात्र, वर्षभरानंतर खन्ना या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. राजेश खन्ना यांचे नाव काढून टाकल्यानंतर सलीम-जावेद यांनी स्क्रिप्ट घेऊन अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधला. बच्चन यांना स्क्रिप्ट आवडली असली तरी सुपरहिरो जॉनरबद्दल त्यांना खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.
असा मिळाला अनिल कपूरला सिनेमा
बच्चन यांनी नकार दिल्यानंतर सलीम-जावेद बोनी कपूर यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या भावाचे नाव नायकाच्या भूमिकेसाठी सुचवले. अनिललाही स्क्रिप्ट आवडली आणि त्याने लगेच होकार दिला. अशातच अनिल कपूरला मिस्टर इंडिया हा चित्रपट मिळाला.
मिस्टर इंडियाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
मिस्टर इंडिया २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने भारतात १० कोटींची कमाई केली होती. मिस्टर इंडिया हा एक आयकॉनिक ब्लॉकबस्टर बनला आणि अजूनही भारतात बनवलेल्या सर्वोत्कृष्ट सुपरहिरो चित्रपटांपैकी एक मानला जातो.